Part 1..भाग 1
मी जे लिहणार आहे.. ते माझ्या जीवनातील प्रसंग आहेत, थेट नाव घेणं मी टाळले.. कारण मी कुणाच्या नावाने काहीतरी लिहावं एवढं माझं कर्तृत्व नाही.. पण स्थानिक आणि भाषिक अस्मितेसाठी खारीचा वाटा तेवढा दिला.. त्यातून आलेले काही कटू तर काही गोड अनुभव.. राज्यपालांच्या स्टेटमेंटने बऱ्याच जणांची मराठी अस्मिता जागी झाली आणि मला मात्र त्यांच्या बोलण्यात तथ्य जाणवलं.. आणि एक झालेल्या मराठी जणांचा पोकळपनाही जाणवला.. असो आपण सुरुवात करू, मी राज्याच्या अश्या भागातून येतो जेथे आडनांव अमराठी असूनसुद्धा लोक मराठी बोलतात, मग तो जैन, असो की मारवाडी असो अगदी एखादा मुसलमानही असुद्या.. त्याच्या मराठी बोलण्यानं बर्याचश्या गोष्टी अगदी सहज होत होत्या, म्हणजे धर्म संकटात येत नव्हता, एक भाषा बोलण्याने सहवास अधिक घट्ट होत असे..मी जेव्हा पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी बाहेर शिकायला गेलो, तेव्हा मला कळलं की भाषेचा धर्माशीही संबंध येतो, कारण त्या ठिकाणी बरेच मराठी लोक फक्त आडनाव आणि पोशाख पाहून हिंदी किंवा इंग्लिश बोलत होते, ते माझ्यासाठी नवीन नव्हतं पण धक्का देणारं होत कारण त्याच प्रमाण जास्त होत, आणि मराठीबद्दलची कमीपणाची भावना जास्त होती.. हे मी सर्रास बघू लागलो, कुणास ठाऊक पण जे मी बघत होतो ते मला टोचत होतो, कित्तेक वेळेस अनाठायी वाद जवळच्या लोकांशी घातले, चर्चा केल्या. मग मी माझ्या परीने काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, एखाद्या दुकानावर, थिएटर, किंवा हॉटेलमध्ये जर गरज नसताना संवाद हिंदी किंवा इतर भाषेतून चालू असेल तर मुद्दामहून तेथे मराठीत
बोलायचो, आणि मग त्या समोरच्या लोकांना कळायचं की अरे समोरचा पण मराठीचं आहे.. अस मी कमीत कमी हजार पाचशे ठिकाणी तरी केलं असेल.. पण नकळतपणे.. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक गोष्ट जाणवली की आपल्या राज्यात जर एखाद्या अनोळखी माणसाला अनोळखी शहरात बोलायचे असेल तर मराठीची गरज नाही, कारण आपली धारणा झाली आहे की सगळ्यांना मराठी कळत नाही बोलता येत नाही, त्यापेक्षा सुरुवात हिंदीत करा आणि मराठीला झुंडीची भाषा राहुद्या.. माझ्या आयुष्याचं थोडं प्रमोशन झालं आणि थोड्या अजून चांगल्या शहरात गेलो, राज्यातील 4 नंबरच्या शहरात गेलो, जिथं जाणवलं की मराठी ही इथेतर झुंडीची आणि समूहाची पण भाषा नाहीये, आहे ती फक्त सरसकट घरी आणि दारी बोलल्या जाणारी भाषा.. रिक्षा स्टँड वर पण सरासरी हिंदीत विचारलं जायचं, मग मी तिथे पण माझा पॅटर्न राबवला..आपण सुरुवात करायची बस.. फक्त रिक्षा स्टँडच नाही, तर रेल्वे स्टेशन, खासगी ट्रॅव्हल्स, खासगी बँका, हॉटेल्स आणि सगळे ठिकाणं जाणीवपूर्वक मराठीत कोणीच बोलत नव्हतं.. तिथे जाणवलं की अंघोळीला घेतलेले पाणी आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मिता ही फक्त ओघळती आणि तकलादू आहे ते.. या सर्व आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी सतावत होत्या, अजून तर भूकंप होणे बाकी होते कारण एका मोठ्या संस्थेत शिकायला जाणार होतो, वाटलं होतं आपलंच राज्य आहे, आपलाच विभाग आहे सगळं अगदी आपल्या सारखंच असलं, पण..पण नेमकं तिथे गेल्यावर मला जाणवलं की मराठी अस्मिता ही फक्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाहीये तर ich मध्ये आहे.. आणि ती जिवंत ठेवलीय शेवटच्या पिढीने. कॅम्पसमध्ये, आणि कलासमध्ये मराठी भाषा ही पर्यायी होती..पण मला याचं समाधान होत की चला आपल्या कॉलेजच्या आवारात तरी मराठीवर काही बंधन नाहीत.. माझ्या वर्गात कलाससोडून इतर वेळेस सांगायचं झालं तर दोन ते चार लोकांसाठी बाकीचे चाळीस लोक निर्लज्यपणे हिंदीत बोलायचे.. कधी त्या एकानेही तसदी घेतली नाही की बाबांनो इथे जन्मलात तर निदान भाषा तरी शिका, कधी एखाद्या शिक्षकाने मराठीत काही शिकवायला सुरुवात केली तर तोंड वाकड करणारी पोरं मी माझ्या कलासमध्ये बघितली, आपलं मराठीपण तथाकथित उच्च आणि एलिट लोकांच्या नजरेस येऊ नये याची पुरेपूर काळजी घेणारे लोक मी माझ्या वर्गात पाहिले, आणि ते ही ,मराठी, . माझ्या गावपणामुळं माझ्याकडे येऊन मराठीत बोलायचे, मी पण कधी माझी भाषा बोलायला लाजलो नाही, कॉलेजमधील एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातसुद्धा जेव्हा वक्ता विचारायचा की कोणत्या भाषेत बोलू? तेव्हा वाईट वाटायचं.. आणि मोचक्या चार पाच लोकांसाठी 100 जणांना डावलल्या जायचं.. पुढे मला जाणवलं की मराठी icu मध्ये नाहीये तर व्हेंटिलेटरवर आहे.. कारण मी अनेकवेळा बघितलं, अनुभवलं की मराठी बोलणं हे बऱ्याच मराठी आणि अमराठी लोकांना, विद्यार्थ्यांना हे अपमानास्पद आणि गरजेचं वाटत नाही.. अनेक जन्माने आणि आडनावाने मराठी असलेले विद्यार्थी मराठी बोलत नव्हते.. पण मी मराठी बोलायचो म्हणून माझ्यासोबत ते मराठीत बोलायचे.. हे माझ्यासाठी धक्कादायक होत..