श्रद्धा ही वैयक्तिक असते, जेव्हा ती सार्वजनिक होते तेव्हा एक तर ती भांडवल होते किंवा साधन. त्यामुळे प्रभू श्री राम असो की पंढरीचा पांडुरंग या आपल्या श्रद्धा आहेत.. आपण त्या मानतो आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारे मानल्याही पाहिजे. जळी, स्थळी, काष्टी, पाशानी माझे वास्तव आहे अश्या म्हणणाऱ्या देवाला आपण हक्काचं घर बांधून दिलं, यातून आपली देवभक्ती सिद्ध होते. विविधतेत एकता असलेल्या भारतात जेव्हा संपूर्ण देशात एककलमी कार्यक्रम राबवले जातात तेव्हा या देशाची सामाजिक विविधता धोक्यात आहे असे समजावे. मराठी भाषिक असल्याने आपण आपल्या राज्याबद्दल विचार केला तर समजेल की, शेतातल्या दांडाच पाणी पार घरातल्या बेडरूमपर्यंत आलंय,. ज्या गोष्टी आपण बदल म्हणून स्वीकारत आहोत त्या आपल्या संस्कृतीचा भाग केव्हापासून झाल्या? आज राज्यातील प्रमुख शहरामध्ये पोह्याच्या गाड्यापेक्षा चायनीज आणि साऊथ इंडियन जेवणाच्या गाड्या जास्त दिसत आहेत, आपण गरज म्हणून ते खातो सुद्धा पण ते गाडे आता राज्याच्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. सांस्कृतिक आक्रमनाला खाण्यापासून सुरुवात झाली की पुढचा कार्यक्रम सोपा होतो. आपल्या देशातील प्रत्येक राज्याची काही ना काही खासियत राहिलेली आहे, मुळात त्यामुळेच ते वेगळे राज्य आहे पण देशप्रेम आणि धर्मप्रेम सिद्ध करण्यासाठी जेव्हा एखाद्या राज्यातील लोकं आपली मुळं वेगळी आहेत, आपला प्रांत वेगळा आहे हे विसरू लागतात तेव्हा देशातील केंद्र सरकारला आणि मोठ्या राष्ट्रीय पक्षांना त्याचा फायदा होत असतो. आणि नाही जरी फायदा झाला तर त्या राज्यातील लोकं कणा नसलेली माणसे म्हणून वागतात, जगण्यातला स्वाभिमान आणि नवीन्या निघून गेलेलं असतं. दांडिया हा एक उत्सव आहे सण आहे पण आपण लहान असताना मोठी शहर वगळता हा दांडिया राज्यात कुठेच होत नव्हता, गोंधळ, भारूड, कीर्तन असे प्रकार होतं पण मा काली आणि शेरावालीने आंबाबाई आणि काळूबाईची राज्यातील जागा टिपऱ्या मारून कधी घेतली कळलंच नाही. देवीचे अस्तित्व आईच्या रुपाने सगळीकडे आहे. आपल्याकडे अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे आनंदाचा मेळाच भरायचा. क्वचित सत्संग, शिवजगार, रामलीला, शिवलीला असे कार्यक्रम होतं होते पण आता सप्ते आणि या सत्संगांची संख्या सारखीच झाली अगदी काही सत्संग तर हिंदीत व्हायला लागले आहेत. हे बदल जरी सहज झाले असले तरी पण ते आपण किती सहज स्वीकारले आणि नकळत संस्कृतीचे भाग झाले यांचा विचार करा. मनाचे श्लोक, अभंग, ओव्या, सुविचार या सर्वांचे बाळकढू आपल्याला पाजले जायचे पण आज हनुमान चालीसा, रामरक्षा, संस्कृत श्लोक हे मुलांकडून, तरुणांकडून वदवून घेतल्या जातं आहे. सगळे धर्मसाहित्य आपलेच आहे पण आपला विषय आहे प्रादेशिक आणि वैचारिक वेगळेपणाचा. गीता, रामायण, भागवत या सर्वांचे सखोल विश्लेषण माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या मार्फत केले, तुकोबानी तर माणसाने जीवनात कसे वागावे याचे नियमच गाथ्यातून घालून दिले आहेत पण हे वैश्विक, जागतिक तत्वज्ञान काय अडगाळीत टाकण्यासाठी आपल्या संतांनी लिहले? कृष्णाचा, रामाचा संदेश आपल्या लोकांना कळावा यासाठीच तर या संतांनी हे साहित्य मराठीत लिहले ना? एकनाथ, नामदेव महाराजांचे भागवत तर श्री कृष्णाच्या आयुष्याचा सारंच नाही तर उद्देश सुद्धा सांगतो. आम्ही कोणत्याच देवाला कधीच आवं-जावं केल नाही नेहमीच राम, कृष्ण, गणपती, हनुमान यांचा आपण बिनदिक्कत एकेरी उल्लेख करायचो कोणतीच भीती न बाळगता. ती आपली हौस नव्हती तर संस्कृती होती, जगण्याचा एक भाग होता आज आपण ते करताना दिसत नाही. कदाचित देवाबद्दल आपला आदर वाढला असेल पण देव म्हणत असेल ना ' अरे मुर्खा आधी मला तू जवळचा मानायचाच आता परकं केल का रे' रे या शब्दामध्ये आपुलकी आहे. आपल्या राज्यात पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती शोभायात्रा काढून साजरी कधीपासून होऊ लागली, प्रत्येक शहरात कश्या मिरवणुका होऊ लागल्या? याचे काही राजकीय कांगोरे असतील सुद्धा पण आपण हुल्लडबाजी, तिरस्कार, आणि विखारी आनंदाने कधीच मिरवणुका नाही काढल्या. उपवास, कथेचे आयोजन करून आपण हे सण साजरे करायचो मुंबई-पुण्या सारख्या शहरात शोभायात्रा निघायच्या पण तो सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग नव्हता..
#maharashtrasanskruti #marathisan #maharashtraculture #महाराष्ट्रसंस्कृती
