(मिटकरींच्या भाषणाचा संदर्भ) जे दिसत ते मांडायला खूप मोठं धाडस लागत असत.. पत्रकाराने वस्तुनिष्ठ राहावं जात किंवा धर्माच्या आड येऊन सत्य लपवू नये.. हा लिहण्यामागे तेच कारण आहे, ब्राम्हणांचा द्वेष किंवा राग हा सामाजिक कारणासाठी एकवेळ मान्य करू, कारण इतिहास आपली पाठ कधीच सोडत नाही, आणि भविष्याची चिंताही.. पण बदललेल्या राजकीय वातावरणातून माझ्या डोक्यात सतत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा पडत आलीये, ती म्हणजे ब्राम्हणांचा धुर्तपणा आणि कर्मठपणा.. श्रेष्ठत्वाची हाव कोणत्याच बामनाची सुटत नाही.. असे लेख, भाषणं मी नेहमी ऐकत आलोय. यामुळे होत असं की संपूर्ण जातीबद्दलचं विचार संकुचित व्हायला लागतात.. प्रत्येकाला काहीना काहीतरी मानसिक आजार असतोच, कधी समाजाच्या धास्तीने तर कधी अपराधीपणाच्या भीतीने व्यक्तीचे मानसिक आजार आत तसेच दडून राहतात..आणि माणूस त्यासोबत जगायला शिकतो.
एखाद्या व्यक्तीच्या आधारे संपूर्ण समाजाचे मूल्यांकन करणे हे अतार्किक आणि अनैतिक आहे, आज मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न चिघळला असताना, फक्त 10 ते 20 टक्के मराठा समाज हा श्रीमंत आहे बाकीचा मिश्र किंवा गरीब आहे असा युक्तिवाद चालु आहे, म्हणजे आरक्षणाचा विचार करताना समाजाचे सरासरीकरण होत नाही मग चारित्र्य ठरवताना सगळ्यांचे सरासरीकरण कसे होते?
आज पारधी स्वतःवर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का मोडावा यासाठी लढतायेत, प्रत्येक मुस्लिम हा दहशदवादी आणि देशविरोधी नसतो ही सगळ्यांच्या मनातली भावना आहे, दलित हा शब्द उच्चारू नये यासाठी सुद्धा प्रयत्न चालु आहे, हे सर्व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चालु आहे समूह म्हणून आपल्यावर लागलेल्या डागांची मोहीम चालु आहे, आणि जेव्हा ब्राम्हण समाज याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कावा होतो, डाव होतो..!
मुळात दिवसेंदिवस समाज या संकल्पनेची व्याख्या बदलत असताना आपले हे क्रांतिकारी "संकुचित "विचार फक्त व्यक्तीची च नाही तर समाजाची पण प्रगती खुंटवत असतात.
जागतिकीकरण आणि स्मार्टफोनच्या जगात माणसाच्या फक्त जाणिवाच नाही तर समूहहीत साधण्याची वृत्ती आणि स्वार्थ साधण्याची कला ही बदलली आहे ती जागा आता "हावरटपणाने "घेतली आहे माणूस हा दिवसेंदिवस आत्मकेंद्री आणि कुटुंबकेंद्री बनत आहे.
धार्मिक आणि जातीय अस्मिता (प्रादेशिक ) संपूर्ण जगात टोकदार बनत आहेत, झुंडबळी जाण ही जणू काही प्रथाच झाली आहे. एखादा व्यक्ती खुलेपणाने आपले विचार मांडायला थबकतो टोकाचं असेल तर तो बोलणं टाळतो याच कारण फक्त केंद्र सरकार आहे का ? नाही संबंधित समाजाच्या झुंडी माझ्यावर कधीही हल्ला करू शकतात त्या जातीला वारसाहक्काने मिळालेल्या महापुरुषाबद्दल काही चुकीचे बोलल्यास जीवाची खैर नाही, अश्या असंख्य गोष्टी मनात उभ्या राहतात. ब्राम्हण समाजाबद्दलचा तिरस्कार नेहमी पोटातला ओठावर येतो, जाहीर सभेत ब्राम्हण समाजाचे अवडंबर होते, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे म्हणून पांडुरंगाची पूजा करू दिल्या जात नाही, त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामाकडे जातीय नजरेतून पाहणे कितपत योग्य आहे? हे सर्व होत, पण हिंस्र झुंडी का तयार होत नाहीत? ब्राम्हण हा कपटी आणि दगलबाजचं असतो हे सत्य आहे की स्वतःला दिलेला दिलासा ? आपली कुशलता आणि संघर्ष करण्याची वृत्ती ही फक्त इथपर्यंत च?फक्त इतिहासाचा आधार घेऊन आणि ऐकलेल्या थोतांडाच्या नुसार तुम्ही एखाद्या समाजाचे मूल्यांकन करून मत बनवत असाल तर "या भारतात "बंधुभाव नित्य वसू दे हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.
ब्राम्हण फक्त ब्राम्हणांना पोसतो आणि धूर्तपणे बाकीच्याना नाकारतो, कदाचित असेलही पण यापासून आज कोणता समाज वंचित राहिला आहे ? आपलं अस्तिव आणि कर्तृत्व सिद्ध करण्याच्या ऐवजी इथे लॉबिंग चालते म्हणून पळ काढणे कितपत योग्य आहे ?
ब्राम्हण विरोध हा तिरस्काराचा रूपात हल्ली समोर येत आहे, याचा आधार आणि संदर्भ फक्त आणि फक्त वेगवेगळ्या माध्यमातून केला गेलेला अपप्रचारच आहे..
वैचारिक दहशदवादी, समाजविघातक असे द्योतक लावणे आणि ते ही सरसकट अख्या समाजाला ही एका प्रकारची आधुनिक "अस्पृश्यताच "आहे.
खूप अभ्यासपूर्वक लिखाण... Keep it up...
ReplyDelete