2009-10 हा कार्यकाळ, जेव्हा राज्यातील दोन मोठ्या नेत्यांचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व कमी होत होते, मोदींचा भावी पंतप्रधान आणि राहुल गांधींचा पप्पू असा दुरगामी प्रचार देशात सुरु होता, अर्थातच यासाठी एखादी मोठी यंत्रणा नक्कीच असेल. पंतप्रधान पद नाकारल्यामुळे आधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांचा गवगवा पक्षाने सुरु केला होता, राहुल गांधींनी पद तर नाकारले पण आपले दौरे, पक्ष संघटनेवरचे लक्ष कमी केले नाही, त्यामुळे बऱ्यापैकी बॉलीवूड सेलिब्रिटी वेळेप्रमाणे राहुल गांधी तसेच काँग्रेस ची पालखी वहायचे. शाहरुख हा त्यावेळी सुद्धा आपले मूळ आणि वयक्तिक विचार मांडायचा, व्यावहारिक आणि राजकीय गरजा पूर्ण करून. आजही तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले विचार मांडत असतो ते ही सरकारला न दुखावता.
2008 मुंबई च्या हल्यानंतर देशातील मुसलमान आपले देशप्रेम सिद्ध करण्यासाठी धडपडत होते, तसेच जागतिक आणि राष्ट्रीय स्थरावर मुसलमान म्हणजे तो विखारी किंवा दहशदवादीच असला पाहिजे असा समज घट्ट होत होता, 2001 ते 2010 पर्यंत देशात जवळपास 100 अतीरेकी कारवाया झाल्या होत्या, देशातील संवेदनशील वातावरणाचा फायदा घेण्याचे देशातील दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी केले, भाजपने हिंदूंची असुरक्षा तर काँग्रेसने हिंदू दहशदवाद हा मुद्दा चेर्चेला आणला. जर देशातील, राज्यातील मुस्लिम विखारी असतील तर हिंदूंमधील काही कट्टर संघटना या सुद्धा दहशदवादी संघटनेपेक्षा कमी नाहीत असा कायमस्वरूपी उपचार करण्याचे काम काँग्रेसने केले पण ते अर्धवट आणि मर्यादित होते. ज्याचे परिणाम काँग्रेसने 2014 च्या निवडणूकीत भोगले.
शाहरुखची भूमिका समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासात जावं लागत, हम लोग, तमस, फौजी यांसारख्या फाळणी, कट्टरता, बंधुता अशा नाजूक आणि तेव्हढ्याच अमानवी कृत्यांचे चित्रण करणाऱ्या मालिका शाहरुखने जवळून अनुभवल्या आहेत, एखाद्या व्यक्तीसाठी त्याच यश, स्वप्न महत्वाची असतात पण त्याचा समाज, प्रदेश अशांत असेल तर त्याच्यासाठी यश आणि सामाजिक शांतता या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या असतात. 90 दशक हे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण, पण मुंबईतील सिनेमासाठी तर हा काळ म्हणजे अतिशय नाजूक काळ समजल्या जातो.
याच काळात जेव्हा मोठे मोठे कलाकार आपला जीव, पैसा, स्वाभिमान सगळं काही मुंबईतील गुंडासाठी ओवाळून टाकायला तयार होते तेव्हा शाहरुख मात्र इतरांपेक्षा वेगळ्या रांगेत उभा राहिला, प्रतिकार केला नावाअखेर असलेल्या खान या आडनावाचा उपयोग त्याने केला नाही, कारण मिळालेल्या जातीपेक्षा, धर्मापेक्षा ज्या जागी आपण राहतो ती जागा जगण्यासाठी महत्वाची असते, जर मुंबईती राहायचे असेल तर हिंदू-मुसलमान दोन्हीही स्थिर आणि शांत असणं गरजेचं आहे. नेमकी तीच भूमिका शाहरुखने घेतली, दुसऱ्या बाजूला तथाकथित सुपरस्टार आणि भाईगिरी करणारे मोठे कलाकार फक्त शरणंच नाही गेले तर व्यसन, सत्ता आणि हौस करण्याच्या नादात कित्तेक नागरिक आणि देश म्हणून भारताच्या विरोधात गेले. 1993 च्या मुंबईच्या स्फोटात संजय दत्तसह काही इतर जणांचे नावं आले होते, त्यावेळी शाहरुखने हीच भूमिका घेतली की माणूस हा धर्माच्या वर असून त्याच्यासाठी धर्म आहे. त्यावेळी तो मित्र म्हणून जरी संजय दत्तसोबत राहिला असला, तरी कठीण परिस्थितीमध्ये तो त्याच्या विचारावर कायम राहिला. 1991 च्या निवडणुकीत भाजपने उत्तम काम करून आपला हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटत चांगली कामगिरी केली होती 1982 ला 2 जाग्यावर असलेला भाजप देशातील महत्वाचा विरोधीपक्ष झाला होता.
देशातील धार्मिक ध्रु्विकरण हे जोमात वाढत होते, 21 शतकात भारताने पदार्पण केले असले तरी वाटचाल मात्र 18 व्या शतकाकडे सुरु होती, नावं धर्माचे आणि काम अधर्माचे हा जणू अलिखित नियमचं झाला होता, देशपातळीवार मोदी आणि सोनिया गांधी यांची सक्रियता योगायोगाने एकदाच वाढत होती, त्याचा परिणाम आजही दिसतो मोदी आजही जवळपास सगळी टीका ही एकतर गांधी घराणे किंवा काँग्रेसवर करतात त्याच कारण तेच आहे. काँग्रेस या व्यवस्थेला आणि गांधी आडनावाला असलेले वलय मोदी जाणतात. 2000 साली कमल हसनचा एक गांधी-गोडसे या दोन विचारधारंवर भाष्य करणारा सिनेमा आला, त्यात शाहरुखने निशुल्क अभिनय तर केलाच पण त्या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले. त्याने हे फक्त काही चार पैशासाठी केलं असावं असं मुळीच नाही, तर आपल्या कामातून आणि आचरनातून व्यक्त होण्याची शाहरुखची प्रथा आहे, थेट सरकार किंवा ठराविक नेत्याला कोठडीत उभं न करता जनतेला काय ते उपदेश देणे किंवा व्यक्त होणे. हे राम हा चित्रपट शाहरुख नक्कीच एक दिवस पुन्हा प्रदर्शित करेल.
2011 साली अन्नाच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणे ही जरी व्यावहारिक भूमिका असली तरी ती त्यावेळी सुसंगत होती कारण भारतीय नागरिक त्यावेळी अन्नाच्या मागे उभे राहिले कारण ते एका व्यवस्थेला कंटाळले होते आणि काँग्रेस त्या व्यवस्थेचे माध्यम होते, मुख्य म्हणजे अण्णा आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला पण त्यावेळच्या सरकारने किंवा काँग्रेसच्या समर्थकांनी कुणालाही मूर्ख, देशविरोधी ठरवले नव्हते.
माय नेम इज खान हा जरी आपल्यासाठी एक चित्रपट अ सला तरी शाहरुखसाठी ते एक वाईट स्वप्नाचे चित्रण होते, काही ठराविक लोकांमुळे सगळा समाज कसा वाईट ठरू शकतो? मी एक मुसलमान जरी असलो तरी दहशदवादावर माझी इतरांपेक्षा वेगळी भूमिका असूच शकतं नाही. प्रत्येक धर्मातील काही कट्टर लोकांनी त्यांचा धर्म तयार केला आहे आणि ते धर्माची मक्तेदारी घेऊ पाहत आहेत, असे उदगार शाहरुखने 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर काढले होते. शिवसेना एक पक्ष म्हणून या चित्रपटानंतर बदलायला सुरुवात झाली, बाळासाहेब ठाकरेंच्या वॉर्निंग नंतर सुद्धा महाराष्ट्राच्या, मुंबईच्या रस्त्यावर राडा झाला नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दातील धार कमी झाली होती, किंवा त्यावेळी राज ठाकरेंचा मराठीचा मुद्दा जनतेसाठी महत्वाचा बनला होता. चित्रपट प्रदर्शित झाला, दणक्यात चालला सुद्धा आणि शाहरुखला काय म्हणायचे आहे हे जनतेपर्यंत गेले सुद्धा.
शाहरुख हा पाकिस्तान प्रेमी आहे, कट्टर आहे असा समज 2014 च्या दरम्यान अत्यंत टोकावर होता, याचा परिणाम त्याच्या चित्रपटवर झाला पण त्याची लोकप्रियता आणि येणारा पैसा हा अबाधित होता. त्यामुळे शाहरुख तेव्हाही उपयुक्त होता आणि आजही उपयुक्त आहे. याच काळात शाहरुख खानचे अनेक चित्रपट लोकांना आवडले नाही तर काही मुद्दामहून लोकांनी बघितले नाही. त्याचे सगळेच चित्रपट वाईट होते असा विषय नव्हता तर 2013-2014 ला भारतात धार्मिक तेढ वाढत असून मला अस्वस्थ वाटत आहे, असं विधान त्याने एका कार्यक्रमात केलं होतं, सहज केलेले हे वक्तव्य बऱ्याच जणांना रुचल नाही. नंतर शाहरुखने सुद्धा गरज म्हणून भाजप आणि तत्सम पक्षांसोबत जुळवून घेतले, मोदींचे कौतुक केले पण 'पाकिस्तान प्रेमी ' हा काळा डाग त्याची साथ सोडत नव्हता. सोशल मीडियाचा वाढता वापर, मीडियाचे समर्पण, जनतेचा धार्मिक जोश हा शाहरुखला पहिल्यांदा भारी भरला होता, जमेल त्या पद्धतीने स्वतःला देशप्रेमी आणि भारतीय सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न केवीलवाना होता. या संवेदनशील आणि भीतीमय वातावरणात सुद्धा त्याने रईस या चित्रपटामार्फत कंबॅक करण्याचा प्रयत्न तर केलाच पण धर्माधर्मातील भेद, माणुसकी, कट्टरता अशा अनेक गोष्टींवर कथेच्या माध्यमातून भाष्य केले. हा चित्रपट तुम्ही पुन्हा एकदा बघितला तर तुम्हाला कळेल की शाहरुखचा चित्रपटातील राग, संवाद हे काहीतरी आपल्याशी बोलतात.
कालांतराने म्हणजेच 2021-2022 च्या दरम्यान राहुल गांधींकडून लोकसभा निवडणूकीचे पीच बदलण्याचा प्रयत्न होतं होता, पण त्यांना त्यात यश येत नव्हते कारण मोदींची बोलण्याची शैली, प्रभाव आणि सोशल मीडियाची व्याप्ती ही राहुल गांधींपेक्षा निदान 10 पटीने तरी जास्त होती. पैसा, संघटना, कार्यक्रम यांच्या आधारावर भाजपला लढणे शक्य नाही म्हणून काँग्रेसच्या थिंक टँकने लोकांच्या मनाला भिडणारा आणि आभासी मुद्दा चर्चेला आणायचे ठरवले, तो मुद्दा होता ' मोहब्बत की दुकान '. याच मुद्याला घेऊन राहुल गांधींनी 2022-2023 च्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रा काढली, नेमकं याच अस्त्राचा तोड भाजपकडे नव्हता. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा लोकांनी शाहरुखचा कंबॅक असलेला एक सरासरी चित्रपट 'पठाण ' डोकयावर घेतला, छातीशी लावला, सिनेमा प्रदर्शित होण्याआधी भगव्या बिकनीवरून घेतलेली भूमिका ही जनतेला आवडली नव्हती. खानपान, वागणूक, संवाद तसेच खाजगी आयुष्यात होणारा धार्मिक आणि संप्रदायिक हस्तक्षेप जनतेला नको होता, धर्म आणि राष्ट्रवादाच्या मर्यादा आता जनतेला हव्या होत्या, कित्तेक वर्षानंतर जनतेने आपला रोष चित्रपटावर बहिष्कार न करता, चित्रपट बघून केला होता. इतिहासात पहिल्यांदा एखाद्या पंतप्रधानाने आपल्या प्रवक्त्यांना आणि मंत्र्यांना चित्रपटावर गरज नसताना बोलू नये अशी वॉर्निंग दिली होती. आपल्या नजरेत ही गोष्ट एक नेहमी घडणारी जरी वाटत असली तरी पठाणचे यश हा एक फक्त उद्योग नव्हता तर 2024 निवडणूकीच्या आधीचा एक 'राजकीय आणि सांस्कृतिक ' सोहळा होता. याच चित्रपटाच्या आधारे भाजपने आपली भूमिका थोडी लवचीक केली तर राहुल गांधींनी तथा काँग्रेसने आपला 'डरो मत' आणि 'मोहब्बत की दुकान हा मुद्दा पुढे रेटला. शाहरुखसाठी पठाण हा जरी एक 5 वर्षांनंतर आलेला चित्रपट असला तरी काँग्रेस आणि भाजपसाठी 'पठाण ' हा चित्रपट लिटमस (पूर्वपरीक्षा )टेस्ट होती.

No comments:
Post a Comment